साधकांचे मनोगत

हरी ॐ

साधक – सुनिल पारखी (निजदास)

गुरुवर्य, योगदास जय गणेश जोशी यांना पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त खूप खूप सादर प्रणाम.

खरं तर माझ्या या थोर सद्गुरुंबद्दल शब्दात लिहिणे हे फार फार कौशल्याचे काम मला वाटत आहे. कारण जे गुरुतत्त्व शब्दातीत आहे, जे तर्कातीत, बुद्धितीत जे कल्पनातीत आहे, ते शब्दबद्ध करणे म्हणजे… तरी सुद्धा अशा या मंगलदिनी योगदासांविषयी आदराचे, प्रेमाचे काही शब्द लिहिण्याचा मी प्रयत्न करत आहे.

मला येथे सर्वप्रथम संत कबीरजींचा एक दोहा आठवतो. ‘सब धरती कागज करू, लेखन सब वनराय । सातसमुद्रकी मसि करु. गुरुगुण लिखा न जाय ।। अर्थात, सगळ्या धरतीचा कागद केला. सातही समुद्रांची शाई वापरली. तरी गुरुगुण लिहिणे शक्य नाही एवढा हा गुरुमहिमा थोर अगाध आहे. असो.

योगेश्वरकृपेने योगदास यांच्या सहवासाचा, सत्संगाचा लाभ मला गेले २२ वर्षांपासून होत आहे. साधारण १९९९ च्या सुरुवातीला मी त्यांना प्राणायाम, ओंकार, ध्यानशिबिरासाठी भेटलो तेव्हापासून आजपर्यंत आमचा नित्यनियमित सत्संग सुरू आहे. यामुळे माझ्या जीवनात एक आध्यात्मिक क्रांती झाली. इतक्या वर्षांमध्ये मला आलेले काही अनुभव मी लिहिण्याचा प्रयत्न करत आहे.

१) ज्ञानगंगा दुथडी भरून वाहात आहे.

गेले २२ वर्षांच्या सहवासातून त्यांनी आम्हाला भरपूर ज्ञान दिले. ‘उपरवाला जब देता है, तो छप्पर फाडके देता है’ या वाक्याची आम्ही प्रचिती घेतली. पुढील काही विषयांवर त्यांनी आम्हाला भरभरून ज्ञान दिले.

अ) विविध सूत्रे पातंजलयोगसूत्रे, शिवसूत्रे, नारदभक्तिसूत्रे, शांडिल्यभक्तिसूत्रे.

ब) विविध उपनिषदे – ईशावास्य, कैवल्य, कठ, निर्वाण, अध्यात्म, आत्मपूजा.

क) गीता श्रीमद्भगवद्गीता, अष्टावक्रगीता.

ड) विविध संतांचे तत्त्वज्ञान चिनी संत लाओत्से यांचे ‘ताओ तत्त्वज्ञान संत कबीरजींचे दोहे, संत दादू दयाल यांच्या साक्या, ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, पसायदान, ज्ञानेश्वरीवर निवडक प्रवचने, श्रीसमर्थ रामदासांचे मनाचे श्लोक, दासबोध, आत्माराम भगवान आद्य शंकराचार्यांचे भजगोविंदम्, श्रीकृष्णाष्टकम्.

इ) इतर नित्यतत्त्वबोध, दैनंदिन प्रवचने, बोधकथा, श्रीकृष्णलीला बोध. अशा अनेक विषयांवर त्यांची ६० हून अधिक पुस्तके पण प्रकाशित झाली आहेत. अशाप्रकारे दुथडीभरून वाहणाऱ्या ज्ञानगंगेत आम्ही भरपूर आनंदाच्या डुबक्या घेत आहोत. त्याचप्रमाणे त्यांनी भरपूर आध्यात्मिक शिबिरे पण घेतली. त्यात ते योगासने, प्राणायाम, ओंकारजप, हस्तमुद्रा ध्यान शिकवायचे. आमच्याच घरी ५-६ शिबिरे झाली. त्यामुळे मला या अनेक शिबिरांचा लाभ झाला. सप्तचक्रे योगसाधना, कुंडलिनी जागृती यांवर योगदासांचा विशेष भर आहे.

२) जीवननौकेचे सुकाणू योग्य दिशेला वळविले.

इतक्या वर्षांच्या या ज्ञानसिंचनामुळे हे ज्ञान आमच्यात सहजच मुरत गेले. या मिळालेल्या ज्ञानावर, पुस्तकांवर आम्ही थोडा अभ्यास सुरू केला. त्यावर थोडा विचार, चिंतन, मनन केले. जीवनातील जे काही गूढ महत्त्वाचे प्रश्न असतात त्यावर आम्हाला उत्तरे मिळत गेली.

हे विश्व कसे निर्माण झाले? याचा निर्माणकर्ता विश्वेश्वर आहे तरी कसा? आपले मूळ कोठे आहे? आपल्या जीवनाचा नेमका उद्देश काय? जीवन कसे जगायला पाहिजे? त्या विश्वेश्वराकडे जाण्याचा मार्ग कोणता? अशा गूढ प्रश्नांची उत्तरे मिळत गेली. त्याचप्रमाणे काही महत्त्वाचे आध्यात्मिक शब्द, उदा. अद्वैत, गुणातीत, दर्शन, योग, कैवल्य, अंशात्मा परमात्मा, संचित, मुक्ती अशा गूढ शब्दांचाही उलगडा होत गेला. त्याबरोबर आम्ही शिबिरांमधून जी योगसाधना शिकलो, ती पण नित्यनियमित चालू होती. त्यामुळे देहात योगऊर्जा प्रज्वलित झाल्यामुळे विवेक, संयम काही प्रमाणात जागृत राहिला.

जीवनात योग्य काय व अयोग्य काय याचा आत कुठेतरी बोध होत गेला. संतमहिमा तर थोर आहेच. ‘आपणासारिखे करिती तत्काळ. एक गोष्ट आत पक्की मुरली की आता या जन्मीतरी संचितात नवीन भर घालायची नाही. जे अगोदर तयार झाले आहे तेच संपवून टाकणे. जशी परिस्थिती समोर येत आहे, त्याचा विनातक्रार सर्वस्थाने स्वीकार, श्रीकृष्ण जीवनावरील ३ पुस्तकांचा आम्हाला त्यासाठी खूप उपयोग झाला, जी परिस्थिती मला आत्ता मिळाली आहे तीच माझ्यासाठी योग्य आहे माझे संचित संपवायला. परमात्म्याला माहीत आहे की कुणाला, कधी, काय, किती द्यायचे ते, तसा तो देणारच आहे. आपण उगाच त्यात विनाकारण ढवळाढवळ करायची नाही. त्यामुळे साक्षी भाव वाढला. आचरणात बदल झाला.

आपला नित्य कर्मयोग व्यवस्थित करायचा. सत्संगातून ज्ञान घेऊन त्यावर चिंतन, मनन करून ज्ञानयोग प्राप्त करायचा. गुरुज्ञानावर, परमात्म्यावर श्रद्धा ठेवून भक्तियोग करायचा त्याला जोड द्यायची योगदासांनी सांगितलेल्या नित्यउपासनेची. असा आमचा नित्य दैनंदिन कार्यक्रम सुरू झाला. जीवन एक आनंदाची यात्रा सुरू झाली. योगदासांनी दिलेला महामंत्र तत् सत् त्वम असि’ ह्याचा बोध झाला.

अशाप्रकारे आमच्या जीवननौकेचे सुकाणू योगदासांनी योग्य त्या दिशेला वळविले.

3) कर्मकांडातून मुक्तता

लहानपणापासून आमच्या घरी धार्मिक वातावरण होते. घरच्या देवांची नित्यपूजा, सोवळे-ओवळे, देवळात जाणे (कसबा गणपती जोगेश्वरी देवी) विविध कुलाचार, गुरुचरित्र पारायणे, श्राद्धपक्ष, काही देवादिकांच्या जयंत्या उपवास, हळदीकुंकू, सणवारांच्या पूजा, जेवायला ब्राह्मण सवाष्ण अशी भरपूर लोकांची येणीजाणी होती. आम्ही मोठे झाल्यावर त्यात काळानुरूप काही कमी होण्याऐवजी भरच पडली. उदा. सकाळ-संध्याकाळ अग्निहोत्र, नित्यसंध्या. वणी त्र्यंबकेश्वर, नरसोबावाडी येथे जाऊन पारायणे असे भरपूर धार्मिक सोपस्कार सुरू होते.

पण जसजसा योगदासांचा सत्संग सुरू झाला, आध्यात्मिक ज्ञान आत मुरायला लागले. परमात्मा म्हणजे नेमके काय स्वरूप काय आहे? सर्व सोपस्कारांचा उद्देश काय त्या सूक्ष्मातिसूक्ष्माकडे जाण्यास वरील जड उपाय योग्य आहेत ? विविध प्रश्नांचा उलगडा झाला काही काळाने आपोआपच सोपस्कारांमध्ये रस वाटेनासा झाला हळूहळू सर्व सोपस्कार झाले. इतके झाले पार गळ्यातले जानवे, हातातली अंगठी, कपाळावरचा टिळा सर्व काही बंद झाले. अगदी सहज झाले त्यांची जागा घेतली योगदासांच्या नित्य उपासनेने. नित्यनियमित योगासने, प्राणायम, ओंकार जप, सप्तचक्रावर ‘ॐ सत् त्वम असि महामंत्राचा जप, मौन प्रशान्त बसणे जसे जमेल तसे ध्यानधारणा. त्यामुळे वरील सर्व धावपळ, वणवण झाली स्थिर स्थित होऊन आत बघणे सुरू झाले. यासाठी सत्संगात योगदासांनी सांगितलेले ‘आत्मपूजा उपनिषद’ खूप भावले. योगदासांच्या गुरुकृपेने आत्मज्ञान हेच श्रेष्ठज्ञान, आत्मदर्शन, आत्मभान ह्यांचे महत्त्व पटले.

एकदा घरी सत्संग असताना माझ्या आईने योगदासांना विचारले की, “सुनिलने अगदीच सर्व काही सोडून दिलंय. संध्या नाही, पूजा करत नाही, पारायणे नाही, देवळात जात नाही, असा कसा एकदम नास्तिक झालाय कळत नाही.” योगदासांनी शांतपणे उत्तर दिले. “आई, काळजी करू नका. उत्तम प्रगती आहे. अहो, ही साधने आहेत, साध्य नाही.”

अशाप्रकारे योगदासांनी मला धार्मिकतेमधून आध्यात्मिकतेकडे नेले. आत्मस्वरूप अवस्था कशी महत्त्वाची आहे, याचा बोध झाला. नाहीतर आयुष्यभर सोपस्कारांमध्येच / कर्मकांडामध्येच अडकून राहिलो असतो व जीवननौकेचे सुकाणू भलत्याच दिशेला भरकटले असते.

४) गर्दी नको, दर्दी पाहिजे

योगदास कधीही पैसा, प्रसिद्धी व प्रतिष्ठा यांच्यामागे लागले नाहीत. भरपूर शिष्यगण जमवायचे, त्यांना पाहिजे तसे नाच, गाणी धांगडधिंगा घालायचा हे कधी त्यांनी केले नाही. आध्यात्मिक तत्त्वज्ञान तसेच सत्य ज्ञानापासून ते कधी ढळले नाहीत. नेहमी सत्य ज्ञान, अगदी परखडपणे त्यांनी आमच्यासमोर ठेवले. ज्यांना रुचेल, पचेल तसे त्यांनी घ्यावे. सत्य हे कडू असते. सर्वांना पचायला कठीण असते. त्यामुळे सत्संगाला येणाऱ्या शिष्यांची संख्या नेहमी मोजकीच राहिली. जे खरोखरच दर्दी होते तेवढेच शेवटपर्यंत राहिले. योगदास नेहमीच म्हणायचे, “मला गर्दी नको. दर्दी पाहिजेत.” दर सत्संगानंतर त्यांना नमस्कार केलेला पण आवडत नाही. ते म्हणतात, “प्रत्येकामध्ये तेच एकमेव आत्मपरब्रह्म आहे. फक्त आपल्याला त्याची जाणीव नसते. त्यामुळे फक्त तुमचा वाढदिवस व गुरुपौर्णिमा ह्या दोनच दिवशी मला नमस्कार करू शकता”, असे त्यांनी आम्हाला सांगितले.

योगदासांचा मला आलेला एक दुसरा अनुभव पण मोठा विलक्षण आहे. पूर्वी प्राणायाम, ओंकार, जप, ध्यान याचे शिबिर दोन आठवड्याचे असायचे. मी त्यांना सर्वप्रथम भेटलो ते या शिबिराच्या निमित्ताने या शिबिराला उपस्थित राहाण्याचे मी त्यांना अगोदरच सांगितले होते. त्या दिवशी शिबिर सुरू झाले. ज्या दिवशी मी एकटाच होतो. आम्हाला प्रश्न पडला की, “आता एकट्यासाठी शिबिर घ्यायचे का?” योगदासांनी २ मिनिटे विचार केला व मला विचारले, “तुम्हाला शिकण्याची इच्छा आहे ना? मी ‘हो’ म्हटले, “मला तर शिकायची खूप इच्छा आहे.” मग त्यांनी माझ्या एकट्यासाठी ते शिबिर घेतले. माझ्यासाठी ती मोठी पर्वणी होती. मी एकटा असल्याने खुप प्रश्न विचारले व त्यावर योगदासांनी अगदी मोकळेपणाने त्यांच्या विविध गूढ, रहस्यमय आध्यात्मिक अनुभूती माझ्यासमोर मोकळ्या केल्या. माझ्या भरपूर शंकांचे निरसन झाले.

५) अस्पर्शयोग घडविला

संसारात राहूनही अध्यात्म साध्य करता येऊ शकते, हे आम्ही योगदासांकडून शिकलो. त्यासाठी संसार सोडून दूर कोठेतरी संन्यास घ्यायची काही जरुरी नाही. किंबहुना योगी हा संन्यासांपेक्षा कसा श्रेष्ठ आहे हे त्यांनी आमच्या मनावर बिंबविले. त्यामुळे संसाराची भीती गेली. संसारातील भोग चिकटतील का ही शंका दूर झाली. त्यासाठी योगदासांनी आम्हाला विविध दृष्टांत दिले. संसारातील काही सोप्या युक्त्याही सांगितल्या.

जसे की, चिखलात राहूनही कमळ अशुद्ध व शुद्ध पाणी, दोन्हीही चिकटवून घेत नाही. चिखलातही सौंदर्य आहे. सुवास आहे, नयनरम्य रंगसंगती आहे हे कमळ आपल्याला दाखवून देते. पाण्यात राहूनही कोरडे राहण्याची कला, नारळात राहूनही सुकल्या खोबऱ्यासारखे करवंटीपासून विलग होणे, आपल्याच घरात काही दिवस पाहुण्यासारखे कसे राहायचे, संसारातील गोष्टींचा उपयोग करायचा, उपभोग नाही. माया म्हणजे नेमके काय ? त्यात कसे गुंतायचे नाही. अशा विविध कला, युक्त्या त्यांनी शिकविल्या.

त्यामुळे संसारात राहूनही आमची आध्यात्मिक वाटचाल योग्य दिशेने सुरू राहिली. संसारात राहताना पापपुण्य, शुभअशुभ, चांगलेवाईट अशा गोष्टी आता आमच्या मनातही येत नाहीत. काही प्रमाणात एक सहजावस्था प्राप्त झाली. ‘चंदनाचे परिमळ, आम्हा काय त्याचे’ ही संतवचने थोडीफार उमजू लागली. अशाप्रकारे काही प्रमाणात ‘अस्पर्शयोग’ घडविला.

भाजीत मीठ आवश्यक आहे. छान चव येते पण तेच मीठ जास्त झाले तर भाजी बेचव होते. तसा संसाराचा उपयोग देहधर्मापुरताच करायचा, उपभोग घ्यायचा नाही याचा बोध झाल्यामुळे आध्यात्मिक यात्रेत संसाराचा अडथळा कधी वाटला नाही. यासाठी मला माऊलींच्या अमृतानुभवमधील पहिलाच अध्याय ‘शिवशक्तीसमावेशन’ व योगदासांचे ‘ब्रह्म व माया निरुपण विशेष भावले.

६) आध्यात्मिक बोलते केले

पूर्वीपासून मला चारचौघांसमोर अध्यात्मावर बोलण्याचे धारिष्ट नव्हते. किंबहुना तशी सवय पण नव्हती. पण योगदासांनी आम्हाला आध्यात्मिक बोलते केले. दरवर्षी आम्ही तीन कार्यक्रम साजरे करतो. गुरुपौर्णिमा, गोकुळअष्टमी व गीताजयंती.

योगदास आम्हाला म्हणायचे की, “या कार्यक्रमात साधकांनी बोलावे. मी तर वर्षभर प्रवचने देतच असतो. या दिवशी तुम्ही बोलत जा. व्यक्त व्हा. जसे जमेल तसे आपले काही अनुभव, आवडलेला श्लोक, ओबी, आपले काही विचार, अभंगस्तोत्र यावर बोला.”

सुरुवातीला बोलताना आम्ही सर्वजण या मार्गावर शिकाऊच होतो. पण योगदासांनी आम्हाला सतत प्रोत्साहित केले. सुधारायची संधी दिली. योग्य ते मार्गदर्शन केले. एखाद्या विषयावर बोलताना त्या विषयाचा कसा सखोल अभ्यास पाहिजे, विषयाची मांडणी कशी करायची, श्रोत्यांना समजेल त्या भाषेत विविध उदाहरणे कशी द्यायची, त्यासाठी आपले आचरण कसे पाहिजे अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

त्यामुळे एखाद्या विषयावर बोलताना आमचा त्या विषयाचा अभ्यास सहजच होत गेला. आम्हाला बोलते करण्यामागे योगदासांचा दुसराही एक मोठा विचार होता की, आज ना उद्या आमच्यापैकी काही साधक / साधिका अध्यात्माच्या अंतिम टप्प्यांपर्यंत पोहचले. साक्षात्कारित झाले व त्यांना श्रोत्यांसमोर प्रवचने घ्यायची वेळ आली तर त्यांना सहजच सभाधारिष्ट यावे जेणेकरून हे गूढ आध्यात्मिक ज्ञान लोकांपर्यंत योग्य पद्धतीने पोहचवले जाईल. आध्यात्मिक ज्ञानाचा योग्य तो प्रचार व प्रसार होईल. वरील सर्व गोष्टींमुळे मला चारचौघांत अध्यात्मावर बोलण्याचा आत्मविश्वास वाढला.

७) गुरुमाऊली आईच्या मायेने मोठे केले

सुरुवातीला अध्यात्माच्या वाटेवर आम्ही सर्व जण तसे लहानच होतो, बालबुद्धिचे होतो. अडखळत होतो. तसेच सर्व जण प्रापंचिकही होतो. प्रपंचातल्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळूनच अध्यात्म साध्य करायचे होते. सुरुवातीला आम्ही चुकतही होतो. काही विषय पटकन आकलन होत नव्हते. पण योगदास आम्हाला आईच्या मायेने सांभाळून घेत होते. परत परत तो विषय, सोप्या, रसाळ भाषेत विविध उदाहरणे देऊन आमच्या गळी बिंबवत होते. त्या बाबतीत योगदासांचा विवेक, संयम आम्ही धन्य मानतो. साधक मंडळींच्यात आध्यात्मिक ज्ञान सखोल रुजावे, त्यांचा आत्मोद्धार व्हावा ह्या तळमळीने ते आम्हाला सतत ज्ञान देत आहेत. न कंटाळता, अव्याहत, हातचे काहीही राखन न ठेवता.

एकदा तर मी माऊलींच्या हरिपाठातील अभंगावरती एक शंका विचारली, ती तर त्यांनी सांगितलीच; पण पुढीलच आठवड्यात त्यांनी माझ्यासाठी संपूर्ण हरिपाठावर पुस्तक लिहिले. तसेच त्यांनी माझ्या आईसाठी पण नारद भक्तिसूत्रावर पुस्तक लिहिले.

पहिल्यांदा जेव्हा मी प्राणायाम, ओंकार, ध्यानाचे शिबिर केले, तेव्हा नंतर कधीतरी बोलताना असे सहज म्हणून गेलो की, आमच्याकडे खूप डास झालेत. नेमके ध्यानाला बसलो की, डास कानाशी गुणगुणतात मग लक्ष विचलित होते. त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी मला घरची एक चांगली मच्छरदाणी आणून दिली. म्हटले, “ध्यानाला बसताना ही लावून बसत जा.” मला फार धन्य वाटले.

एकदा महिम्न सोसायटीच्या हॉलमध्ये प्रवचन असताना माझ्या पाठीत मोठी उसण / चमक भरली होती. तेथे आम्ही खाली सतरंजीवर बसत होतो. मी उठता-बसताना त्यांना काहीतरी वेगळे वाटले. सत्संग संपल्यावर ते मला स्कूटरवरून घरी सोडायला आले होते.

त्यांनी ६० च्या वर पुस्तके लिहिलीत. ती पुस्तके ते स्वतः टाईप करतात. स्वत: त्याची बांधणी करतात. जेणेकरून वाजवी किमतीत ती साधकांना उपलब्ध व्हावीत. त्यांनी आ ला नुसतेच आध्यात्मिक ज्ञान दिले नाही, तर भौतिक, वैयक्तिकही मार्गदर्शन केले. कुठलाही सल्ला विचारताना आम्हाला योगदासांचा एक मोठा आधार वाटतो. ते नेहमी स्वच्छ, निर्मळ आईच्या मायेनेच आम्हाला सल्ला देणार, याची आम्हाला खात्री आहे. त्यांचा उद्देश एकच, साधकांनी आत्मोन्नती करा. आत्मज्ञानी व्हा. आत्मभान सतत जागरूक ठेवा. साक्षात्कारी व्हा. सायुज्ययुक्त व्हा व पुढे प्रभूचे कार्य चालू ठेवा. प्रभूकार्य करणे त्यासारखे दुसरे कुठले उत्तम कार्य नाही.

अशा पद्धतीने सद्गुरूंना गुरुमाऊली का म्हणतात, संत ज्ञानेश्वरांना ज्ञानेश्वर माऊली का म्हणतात, विश्वेश्वराला परमपिता म्हणण्यापेक्षा विश्वजननी का म्हणतात, याचा उलगडा झाला.

अशाप्रकारे गेले बावीस वर्षांच्या योगदासांच्या सहवासाने, त्यांच्या ज्ञानामृताने, त्यांनी सांगितेल्या उपासनेने, माझ्या जीवनात एक आध्यात्मिक क्रांती झाली. एक आध्यात्मिक जाग आली. जीवन एक आनंदाची यात्रा झाली. जीवन जगताना चढउतार असायचेच, पण त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. एक अमूल्य असा आत्मज्ञानाचा ठेवा मिळाला की जो जन्मोजन्मी साथ देणारा आहे. सत्संगाची महती सर्वांनीच गायिली आहे. मी ती प्रत्यक्ष अनुभवली. जीवनातील ताणतणाव, अस्थिरता, विनाकारण धावपळ कमी झाली व एकप्रकारची तृप्ती, समाधान मिळाले. आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी आपले संतमहात्मे यांनी आपल्यासाठी, मानवी जीवनासाठी किती अमूल्य ठेवा ठेवला आहे, ह्याची प्रचिती आली. अशांपुढे केवळ नतमस्तक होणे व त्यांचे ज्ञान आचरणात आणणे एवढेच आपण करू शकतो. हा अमूल्य ठेवा योगदासांच्यामुळे आम्हाला मिळाला. सद्गुरू शिवाहूनही थोर आहे असे ज्ञानेश्वर माऊली अमृतानुभवात का म्हणतात हे उमजले. आमची जी काही थोडीफार आध्यात्मिक प्रगती झाली त्याचे संपूर्ण श्रेय आम्ही योगदासांना देतो. नाहीतर संसाराच्या या सुखदुःखात आम्ही जन्मोजन्मी अडकलो गेलो असतो.

असे म्हणतात की, शिष्य हे सद्गुरूच्या नावाने मंगळसूत्र गळ्यात घालतात. त्यांच्या ज्ञानाचा ते वंश आहेत. आज योगदासांच्या पंचाहत्तरीच्या निमित्ताने मी योगदासांना ग्वाही देऊ इच्छितो की, त्यांच्या या थोर ज्ञानाचा वसा मी अथक प्रयत्न करून यथाशक्ती यथामती पूर्ण ताकदीने पुढे चालवीन. सायुज्ययुक्त होऊन प्रभूसेवा करणे, हेच माझे मुख्य ध्येय राहील.

परत एकदा योगदासांना कोटी कोटी प्रणाम

हरी ॐ

सद्गुरू लाभले योगदास । मज भाग्य आले उदयांस ।। जीवननौका योग्य मार्गावर । मस्तक सदा गुरुचरणांवर ॥

१॥ कर्मज्ञान भक्ति मुरली स्वरूपाची ओळख पटली ।। तेणे निरंजनयात्रा सुकर । मस्तक सदा गुरुचरणांवर ।।२।। गुरुसंगे मिळे आत्मज्ञान । जे देई पूर्ण समाधान।। सफल झाला माझा संसार मस्तक सदा गुरुचरणांवर ||३|| सायुज्यमुक्तीने करू प्रभूसेवा । गुरुकृपेचा हाचि मज ठेवा ।। कसे फेडावे हे उपकार । मस्तक सदा गुरुचरणांवर ।। ४।। हरी ॐ

श्री. योगदासजींना विनम्र प्रणाम, दिनांक ३ फेब्रुवारी २०२२ योगदासजी आपण वयाच्या अमृतमहोत्सवी वर्षात प्रवेश करीत आहात. आपल्या प्रत्येक कामातील स्फूर्ती आणि उत्साहाने मला हे कधीच लक्षात येऊ दिले नाही की आपले वय ७५ पोहोचले आहे.
वाढदिवसाच्या आपणास अनंत शुभेच्छा.

योगदासजी आपल्या आयुष्याचा प्रवास या वळणावर आलेला असताना आठवतात ते आपण आजवर केलेले कष्ट ,आपली साधना, आपल्या जगण्यातून, वर्तनातून आपण आमच्यापुढे ठेवलेला आदर्श. इथून पुढील जीवन परमेश्वराने आपणास आनंदी आणि आरोग्यसंपन्न द्यावे हीच त्या योगेश्वर चरणी प्रार्थना करून मी नतमस्तक होते. येणाऱ्या प्रत्येक दिवशी आम्हाला आपणाकडून भरभरून सत्संग घडावा.

मी आपली पत्नी आहे. मी स्वत: ला खूप भाग्यवान समजते कारण आपण लिहीलेला प्रत्येक शब्द मला प्रथम वाचायला मिळतो. मी पूर्ण धार्मिक वातावरणात लहानाची मोठी झाले .लग्नानंतर धार्मिक आणि अध्यात्मिक अशा दोन्हीची सांगड असलेले वातावरण अनुभवले.

योगदासांच्या आमच्या कुटुंबालाच माहीत असलेल्या काही गोष्टी मला येथे नमूद कराव्याशा वाटतात. योगदासांचा जन्म चिपळूण जवळील परशुराम या गावी दासनवमीला झाला. लग्नाआधी मला जेंव्हा योगदासांच्या जन्माची तिथी समजली तेव्हा मी धास्तावून गेले. लग्नाच्या बोहल्यावर काही गडबड होणार नाही ना! असो. योगदास लहानपणी ६ महिन्यांचे असताना पालथे पडायला लागले आणि काही दिवसांनी जेमतेम ६ ते ७ फूट रांगले. जवळच्या भिंतीला धरून उभे राहिले आणि एकदम पावले टाकून चालायला लागले. त्यानंतर कधी रांगले नाहीत.

त्याच वेळेस माझ्या आजेसासूबाईना त्यांच्यातील वेगळेपण जाणवले. लहानपणापासून योगदासांच्या कपाळावर शंकराच्या पिंडीतील शाळुंकेसारखा आकार उमटत असे. त्याचे माझ्या आजेसासूबाईंना फार कौतुक वाटे.

परशुराम हे गाव तीर्थक्षेत्र, त्यामुळे एकूणच भावभक्तीने ओथंबलेले वातावरण. परिसर शांत, निसर्गरम्य ज्यामुळे भक्तिभाव उद्दिपीत होईल. योगदास ६ वर्षांचे असताना पासून न चुकता नेमाने रोज देवदर्शनाला परशुराम मंदिरात जायचे. त्याशिवाय ते रात्रीचे जेवायचे नाहीत. १० वर्षांचे असताना एक दिवस त्यांच्याकडून हा नेम चुकला. रात्र झाली, आपण आज देवदर्शन घेतले नाही हे लक्षात आल्यावर बेचैन झाले. रात्री तर मंदिर बंद होते. आता काय करायचे, तेव्हा परशुरामाला वीज आलेली नव्हती. देवदर्शन घेतल्याशिवाय जेवणार नाही असे म्हंटल्यावर माझ्या सासुबाई कंदील घेऊन त्यांच्या बरोबर देवळा मध्ये गेल्या. छोट्या योगदासांनी देवदर्शन घेतले. सासूबाईंना हुश्श झाले की आता हा मुलगा जेवेल.

या प्रसंगानंतर माझ्या सासर्‍यांनी योगदासांना निर्गुण, निराकार परमेश्वराची संकल्पना समजावून दिली आणि हाच तो त्यांच्या अध्यात्माचा पाया ठरला. त्यानंतर त्यांचे देवदर्शन घेणे काटेकोर राहिले नाही. लहानपणी योगदास श्रीरामांचा जप लिहून काढत असत, सासऱ्यांनी त्यांना ईश्वराची संकल्पना सांगितल्यामुळे तेही हळूहळू कमी झाले. सास-यांनी त्यांना योगासने आणि प्राणायामाचे धडे दिले .

याच बरोबर तबल्याचे ठेके शिकविले. परंतु हे शिक्षण तेवढ्यावरच थांबले.
बाळपणी त्यांचे खूप सवंगडी होते, खेडेगाव त्यामुळे भरपूर खेळ, मस्ती चाले. मुले संध्याकाळी लवकर घरी जात नसत. आईला मुलांना बोलावून आणावे लागे. परंतू छोटे योगदास मात्र आपले आपण दिवे लावणीच्या आधी घरी परतत. मित्र जास्त वेळ खेळण्यासाठी खूप आग्रह करायचे परंतू नियमनाचा पाठ त्यांनी तेव्हापासूनच अंगी बाळगला होता.

पुढे ८ वी ते ११ वी पर्यंतचे शालेय शिक्षण चिपळूणला युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये झाले. नंतर पुण्याला बृहन्महाराष्ट्र कॉमर्स कॉलेजला हॉस्टेलवर राहून शिक्षण घेतले. लहानपणी परशुरामच्या दारी अनेक दिग्गज शास्त्रीय संगीत गायकांचे गाणे ऐकलेले असल्यामुळे कानावर नादब्रम्हाचे, अभिजात संगीताचे संस्कार झाले. हॉस्टेलच्या वास्तव्यात शास्त्रीय संगीत ऐकायला आवडणाऱ्या मित्रांची संगत लाभली. त्यामुळे अनेक गायक, गायिकांच्या मैफिली ऐकायला मिळाल्या. स्वरराज छोटा गंधर्वांची संगीत नाटके पाहता आली. वाचनाची आवड तर लहानपणापासून होतीच. लोकहितवादी विष्णुशास्त्री चिपळूणकर, गडकरी, चिं.वि. जोशी, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, वि. आ. बुवा, ओशो, स्वामी विवेकानंद, स्वामी चिन्मयानंद यांची पुस्तके वाचली.

योगदासांनी काही वर्षे पुण्यात, काही वर्षे आफ्रिकेत नोकरी केली. आफ्रिकेत घनदाट जंगल, अटलांटिक महासागराचे सानिध्य, निरव शांतता यामुळे त्यांच्या अध्यात्मिक साधनेने जोर धरला. तेथेच त्यांना १९८४ साली भगवंतश्रीचा दर्शन प्रसाद प्राप्त झाला.

पुण्यात परत आल्यावर काही वर्षे व्यवसाय केला. परंतू अध्यात्माची ओढ त्यांना स्वस्थ बसू देईना. त्याच ओढीने त्यांनी विविध उपनिषदे अभ्यासली आणि त्यावर लेखन केले. त्यांची भगवद्गीतेसह विविध अध्यात्मिक विषयावरील ६० हून जास्त पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ही सर्व पुस्तके आधुनिक संगणक तंत्रज्ञान आत्मगत करून स्वतः DTP करून, पुस्तकाचे मुखपृष्ठ तयार करून प्रकाशित केली आहेत. नवीन तंत्रज्ञान शिकण्याचा त्यांचा उत्साह पाहून मी स्तिमित होते.

प्राणायाम, ओंकार यांची अनेक शिबिरे आयोजित केली. आजवर शेकडो साधक प्राणायाम, ओंकार शिकले. त्यांनी स्वतःची ओंकार साधना विकसित केली आहे. आजपावेतो त्यांनी अनेक उपनिषदे, दासबोध, श्रीमद्भगवतगीता अशा विविध अध्यात्मिक विषयांवर शेकडो प्रवचने दिली आहेत. त्यांच्या रसाळ आणि ओघवत्या वाणीतील प्रवचने ऐकण्याचा आनंद अद्भुत असतो. आता lock down च्या काळात त्यांची ऑनलाईन प्रवचने सुरू आहेत. त्यांनी हस्तमुद्रा विकसित केल्या आणि अनेकांना शिकविल्या.

योगदास होतकरू विद्यार्थ्यांना की ज्यांच्या पालकांची आर्थिक स्थिती ठीक नसते तथापि ही मुले प्रतिकूल परिस्थितीत ९५% ते ९९% मार्क्स मिळवितात, तसेच धारातीर्थी पडलेल्या हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या गरजू कुटुंबीयांना तसेच लायक गरजू आजारी व्यक्तिंना आर्थिक मदत करत असतात.

योगदास अध्यात्मिक असल्यामुळे रुक्ष वाटत असले तरी नातेवाईक जमले की छान हास्य विनोद करत असतात. परंतू त्या समारंभातून त्यांना चटकन अलिप्त होता येते. मुलींची लग्ने झाल्यावर त्यांनी पांढरा पोशाख वापरायला सुरुवात केली.

माझ्या व्यक्तिमत्वात त्यांच्या प्रवचनाच्या श्रवणाने अमूलाग्र बदल झाला. त्यांनी मला लघुत्वातून गुरुत्व पाहण्यास शिकविले.

असे योगदासांचे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. म्हणून म्हणावेसे वाटते गुलाबाचे फूल टवटवीत असते त्याला पाहून मनही टवटवीत होते. त्याच्या पाकळ्या सुगंध देतच असतात. त्या पाकळ्यामध्ये अध्यात्मिक तत्वज्ञानाची साखर घातल्यावर त्याचा गुलकंद तयार होतो. वयाची पंच्याहत्तरी हा गुलकंद आहे. त्याचा पुरेपूर उपभोग घ्या. तुम्हाला निरोगी, निरामय, आनंदी, संपन्न आयुष्य लाभू दे, आनंदाची बहार तुमच्या जीवनात नित्याने येत राहो ही योगेश्वर चरणी प्रार्थना. हरिॐ.

सौ सविता जय जोशी

साधक – अनुराधा कोटिभास्कर

योगदास श्री जय गणेश जोशी,अध्यात्मिक गुरू आणि आमचे सर सुद्धा !  साधारण गेली १५ वर्षे त्यांचा सत्संग आम्हाला लाभला आहे त्यासाठी आम्ही सर्वजण स्वतःला भाग्यवान समजतो.

आजच्या या अस्थिर वातावरणात शारिरीक तंदुरुस्ती बरोबरच मानसिक संतुलनाची अत्यंत गरज आहे.योगदासांच्या योगशिबिरामधून शिक्षण घेऊन त्यामध्ये सातत्य राखल्यास निरोगी आणि सशक्त राहणे शक्य होते. ही शिबीरे योगासने, प्राणायाम,ओंकार,ध्यान,हस्तमुद्रा अशी सर्वसमावेशक असल्यामुळे त्याचे फायदे साधक आजही अनुभवत आहेत.

योगसाधना या पुस्तकाचे लिखाणही याच हेतूने झाले . त्यानंतर पातंजल योगबोध,भगवद्गीता, अनेक उपनिषदे, अष्टावक्रगीता, ताओबोध अशा अंदाजे ६० पुस्तकांनी अध्यात्म तत्वाचा खजिना आम्हा साधकांसाठी खुला झाला आहे.

योगदासांची प्रवचने ही एक पर्वणी असते. अत्यंत साध्या व सोप्या शैलीत अवघड विषय मांडला जातो. दैनंदिन जीवनातल्या उदाहरणांनी योग्य निर्णय घेतले जातात आणि आपसूकच योगाचरण घडते. प्रत्येक साधकाचे पूर्ण शंका निरसन हा समाधानाचा क्षण आम्ही नेहमीच अनुभवतो.

कोणत्याही कर्मकांडात न अडकता केवळ स्वतःजवळ बसणे, जीवन साक्षीत्वाने जगणे ,निरपेक्ष बुद्धीने कर्म करत राहणे असे अनेक संदेश ते केवळ देत नाहीत तर त्यांचे आचरणही तसेच असते.

त्यांच्या सहवासातून मिळालेला हा अमूल्य ठेवा आणि त्याचे पालन करण्याचा आमचा प्रयत्न यांचा योग जमल्यास कैवल्यानंद दूर नाही हे निश्चित !!

साधक – लता / विद्याधर मा. ताठे.

आज दिनांकाने योगदास श्री. जय गणेश जोशी आपले पंच्याहत्तरीत पदार्पण होत आहे. अमृतमहोत्सवी वर्षाचा श्रीगणेशा होत आहे. पण आपले एकूण समग्र जीवन हेच अमृतजीवन आहे. आपण आपल्या प्रवचनांनी व अक्षरलेणीवत ग्रंथांनी सदैव अमृतच वाटले आहे व अनेक साधकांची जीवने ज्ञानोत्तर भक्तीच्या अद्वयानंदाच्या अमृतवर्षावाने पुलकित केली आहेत, गंधीत केली आहेत. अशा पारिजात अमृतजीवनालाच ‘संत’ म्हणून सानंद व साभिमानाने गौरविले जाते.

भक्तिसाहित्यात संतजीवनाचा ‘कामधेनु’, ‘कल्पतरू’ आणि ‘चिंतामणी’ या अनोख्या विशेषणांनी गौरव केलेला आहे. ही विशेषणे भारतीय चिंतकांच्या उदात्त संकल्पना आहेत. आज योगदासजी, आपला जीवनकार्य गौरव करण्यास आम्हास ‘कामधेनु’, ‘कल्पतरू’, ‘चिंतामणी’ या संकल्पना सार्थ व समर्पक वाटतात. एवढेच नव्हे तर संत ज्ञानदेव माऊलींच्या पसायदानातील ‘चंद्रमे जे अलांछन। मार्तंड जे तापहीन।’ म्हणजे डाग नसलेला शीतल स्नेहल चंद्र आणि दाहक नसलेला सूर्य, या उपमाही आम्हास आपल्या गौरवार्थ यथार्थ वाटतात.

कोणी कोठे, कोणा पोटी जन्म घ्यावा हे कोणाच्याच हाती नसते. तरी पण त्या गोष्टींना प्रत्येकाच्या जीवनात एक महत्त्व असते. योगदासजी, आपला जन्म भगवान परशुरामाच्या भूमीत झाला आणि दुग्धशर्करा योग म्हणजे परशुरामाची उपासना लाभलेल्या घराण्यात झाला. हा एक आपणास लाभलेला निसर्गदत्त भाग्ययोगच आहे. कोकणच्या भूमीने भारताला अनेक नररत्ने दिलीत, ज्यांनी आपल्या कार्याने, समर्पित भावाने देव-देश आणि धर्माच्या अभ्युदयाची आराधना केली. योगदासजी, आपले कार्य अशाच कोटीतील आहे. आम्हा सर्वांचे भाग्य आहे की आपला सत्संग आम्हास लाभला. ‘सत्संग’ हा मागून मिळत नसतो, तो दैवयोगाने लाभतो. आपला आम्हास झालेला लाभ हे ‘नक्षत्राचेच देणं’ आहे. म्हणूनच आपल्या अमृतमहोत्सवाचा आम्हाला विशेष आनंद वाटतो. या आनंदात एक अनामय आत्मियता आहे. हा तुमचा नव्हे तर आम्हाला आमचाच अमृतमहोत्सव वाटतो.

आपण ‘हरि ॐ’ च्या अहर्निश ध्यासाने आत्मानंदात विहरत असता. आपले ‘योगदास’ हे नाव आम्हास संत ज्ञानदेवांनी धारण केलेल्या ‘निवृत्तीदास’, संत तुकोबांच्या ‘राघवदास’, रामभक्त नारायण ठोसरांच्या ‘रामदास’ आणि स्वत:ला ‘नामयाची दासी’ म्हणवून घेण्यात धन्यता मानणाऱ्या संत जनाबाईंच्या नावाप्रमाणे वाटते. दास्यभाव ही आध्यात्मातील एक उदात्त मनोभूमिका / भावावस्था आहे. भक्ती संप्रदायातील आचार्य हनुमंताचा / मारुतीचा दास्यभाव तर जगवंदनीय आहे. आपण योगाचे दास्यत्व स्वीकारून, योग प्रचार-प्रसाराच्या कार्याने आमची जीवने उजळून टाकली आहेत असे आम्हाला प्रांजळपणे वाटते.

आपले ग्रंथ पारमार्थिकांसाठी पर्वणी असून चैतन्यज्ञानाचे दीपस्तंभ आहेत. आपला परमार्थ जसा सुफल संपन्न आहे तसाच आपला प्रपंचही सफल संपन्न आहे. आपल्या सहधर्मचारिणी सौ. सविताताईंची सुंदर साथ हेवा वाटावा अशीच आहे. संसार सुखेनैव परमार्थरूप कसा करावा याचा एक आदर्श वस्तुपाठच आपण आपल्या गृहस्थाश्रमी जीवनाने आम्हा पुढे ठेवलेला आहे. आपणासमवेतच, हिमालयाच्या सावलीसम सविताताईंनाही सानंद शुभेच्छा! आणि आपणास पुनश्च एकदा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त उदंड, सानंद शुभेच्छा, सदिच्छा!

जीवेत शरदः शतम् ॥ १॥

पश्येत शरदः शतम् ॥२॥

बुध्येम शरदः शतम् ||३||

रोहेम शरदः शतम् ।।४।।

पूषेम शरदः शतम् ॥५॥

भवेम शरदः शतम् ॥६॥ भूयेम शरदः शतम् ॥७॥

भूयसी शरदः शतम् ॥८॥ (अथर्ववेद)

आपल्या प्रवचनाच्या ग्रंथांच्या आस्वादक वर्गाचे प्रतिनिधी लता / विद्याधर मा. ताठे. ९८८१९०९७७५/दि. ३ फेब्रु. २०२२

साधक -अपर्णा कुलकर्णी

मी मला स्वतःला अतिशय भाग्यवान समजते, की माझ्यावर आपोआपच चांगले संस्कार घडत गेले. आपणा सारख्या संतांच्या आशीर्वादाने परमात्म्याशी संधान कसे साधायचे जाणू शकले.

विनासायास निर्विचारीता अनुभवणे, थोडया प्रमाणात चालू असते.
अनेक संतांनी अनुभवलेला आत्मसंतोष, (ती स्थिती) मी on and off अनुभवते आहे..
ती स्थिती कायम स्वरुपी अनुभवताना, सक्षिरुप होता येणं हे साधण्याचा प्रयत्न सुरू आहे..

बाकी मी एक साधक आहे. आपल्याकडून मिळत असलेले ज्ञानकण गोळा करणे, हे एक भाग्य आहे.

हरि ॐ

अपर्णा कुलकर्णी